बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हालभावी येथील आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) प्रशिक्षण केंद्राला भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासन सक्रिय झाले आहे.
वंटमुरी ग्रामपंचायत आणि संबंधित शासकीय विभागांनी या केंद्राला आवश्यक असलेले सर्व सहकार्य तातडीने पुरवावे, असे आदेश जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले आहेत.
प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विविध विभागांच्या समन्वय बैठकीत राहुल शिंदे बोलत होते. हालभावी गावाच्या परिसरात सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. प्रशिक्षण केंद्राला कोणत्याही परिस्थितीत पाण्याची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
बैठकीदरम्यान केंद्राचे डेप्युटी जनरल ब्रिगेडियर संदीप झुंझा यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी फेब्रुवारी ते जून या उन्हाळ्याच्या कालावधीत केंद्रात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते, त्यामुळे या काळात केंद्राला नियमित पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या मागणीची गंभीर दखल घेत राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.

आयटीबीपी केंद्र हे राष्ट्रीय महत्त्वाचे केंद्र असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण प्रशिक्षणासाठी येतात. त्यामुळे हालभावी गाव आणि केंद्राचा परिसर स्वच्छ राखणे ही वंटमुरी ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. या भागात दररोज कचरा संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
याचबरोबर केंद्र परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटाबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी सूचना शिंदे यांनी केली. या बैठकीस आयटीबीपीचे कमांडंट सिद्धिक पी.पी., प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पनवर, उपसचिव बसवराज अडविमठ यांसह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





