बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील एस.एस.एल.सी. परीक्षेचा निकाल सुधारण्यासाठी सर्व स्तरावरील शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी आतापासूनच सक्रिय होऊन ठोस कृती आराखडा राबवावा, अशा सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या.
येथील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित बैठकीत राहुल शिंदे बोलत होते. शाळा शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ संवादाद्वारे संवाद साधला. ज्या शाळांचा निकाल १० टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांनी आगामी परीक्षेत कोणत्याही परिस्थितीत कामगिरी सुधारलीच पाहिजे, असे राहुल शिंदे यांनी बजावले.
विषयनिहाय अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करावेत. प्रत्येक विषय शिक्षकाने मुलांच्या उणिवा लक्षात घेऊन दररोज अध्यापन आणि सराव उपक्रम राबवावेत. निकाल उंचावण्यासाठी केवळ शाळांवर अवलंबून न राहता सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले.

पहिल्या पूर्वतयारी परीक्षेत २० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या शाळांना संबंधित तालुक्यातील कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी या आठवड्यात अनिवार्यपणे भेटी द्याव्यात. तेथील परिस्थितीची पाहणी करून तातडीने सुधारणा घडवून आणाव्यात, असे निर्देश राहुल शिंदे यांनी दिले.
येणाऱ्या मुख्य परीक्षेत कमी कामगिरी करणाऱ्या सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांवर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. सर्वांनी निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी गांभीर्याने काम करावे, अशी कडक सूचना राहुल शिंदे यांनी दिली.
मुख्य परीक्षा अत्यंत जवळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नियमित अभ्यास करून घेणे, लेखनाचा सराव करणे आणि विशेष तासिकांचे आयोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी वैयक्तिक स्तरावर प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक अडचणी समजून घेऊन त्या दूर कराव्यात, असे राहुल शिंदे यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपसचिव बसवराज अडविमठ, बेळगाव उपसंचालिका एल. एस. हिरेमठ, चिकोडी उपसंचालक सीतारामा आर. एस., डायटचे प्राचार्य अशोक सिंदगी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी, सर्व ता.पं. कार्यकारी अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.





