बेळगाव लाईव्ह:
खानापूर–हेमाडगा मार्गावरील शिरोली गावानजीकच्या जंगल परिसरात सुमारे २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृतदेह रस्त्यापासून अंदाजे दोन किलोमीटर आत जंगलात मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतदेह मोठ्या प्रमाणात सडल्यामुळे तो काळवंडलेला असून, ओळख पटवणे अवघड झाले आहे. मात्र, मृताच्या अंगावर टी-शर्ट व जीन्स पॅन्ट असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे.
या अनोळखी मृत व्यक्तीबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास, किंवा कोणी युवक बेपत्ता असल्याची नोंद असल्यास खानापूर पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क :
पी.आय. (सीपीआय) – 94808 04033
पीएसआय – 94808 04086
या प्रकरणाचा पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत.





