बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र राज्य येळ्ळूर येथील फलक आणि त्यावरून उद्भवलेल्या संघर्षासंदर्भातील खटल्याची सुनावणी आज बेळगाव येथील दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयात पार पडली. या सुनावणी दरम्यान संबंधित प्रकरणातील आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले असून, न्यायालयाने या खटल्याची पुढील तारीख ४ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली आहे.
या खटल्यातील एकूण १० आरोपींपैकी कुमार परशुराम मासेकर, केदारी रागोजी पाटील, नंदू गोपाळ कुगाजी, राहुल अर्जुन आष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू ज्योतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, जयसिंग यल्लाप्पा आष्टेकर आणि प्रकाश नारायण कुगाजी हे ९ जण न्यायालयात हजर होते.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ मनोज लक्ष्मण नायकोजी यांचे यापूर्वीच निधन झाले असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.

या खटल्यासंदर्भात ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. हेमराज बेंचन्नावर यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयात प्रबळ युक्तिवाद मांडला. येळ्ळूरशी संबंधित एकूण ७ विविध खटले दाखल होते,
त्यापैकी ४ खटले यापूर्वीच निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित खटल्यांची कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज आरोपींचे जबाब नोंदवल्यानंतर आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.





