बेळगाव लाईव्ह : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यल्लम्मा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मंदिर विकास प्राधिकरणाने सर्व तयारी पूर्ण केली असून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन पार पाडत असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी भाविकांच्या सुविधेसाठी पार्किंगची व्यवस्था अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या रांगांचे नियोजन करण्यासाठी बॅरिकेडिंगमध्ये वाढ करण्यात आली असून, क्यू कॉम्प्लेक्सच्या सुधारणेसाठी विशेष निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता येईल.
वाहतुकीच्या नियोजनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, दक्षिण क्षेत्रातील आऊटर रिंग रोडची दुरुस्ती करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या सुधारणांमुळे भाविकांना यावर्षी प्रवासात आणि दर्शनात मोठी सुलभता जाणवेल. येत्या वर्षात नियोजित विकासकामे पूर्ण झाल्यावर ही प्रक्रिया अधिकच सोपी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या नियोजन प्रक्रियेत पोलीस अधीक्षक, रेणुका यल्लम्मा प्राधिकरणाचे सचिव आणि पर्यटन मंडळाचे आयुक्त यांचा सक्रिय सहभाग असून सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.





