बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील आनिगोळ गावात मायक्रो फायनान्स संस्थांच्या कथित छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत महिलेची ओळख गौरव्वा नीलप्पा केंगानूर (वय 36) अशी झाली आहे. जीवनावश्यक गरजांसाठी गौरव्वा आणि तिच्या कुटुंबाने विविध मायक्रो फायनान्स संस्थांकडून 7 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले होते. मात्र कर्जफेडीसाठी होत असलेल्या सततच्या दबावामुळे ती मानसिक तणावात होती, अशी माहिती आहे.
आत्महत्येपूर्वी गौरव्वाने घराच्या भिंतीवर डेथ नोट लिहिली असून, त्यात काही व्यक्तींना आपल्या मृत्यूला जबाबदार धरत मुलांच्या भविष्यासंबंधी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. या डेथ नोटमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहून गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बैलहोंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.





