बेळगाव लाईव्ह : मंगळवारी सायंकाळी बेळगाव शहर व तालुक्यातील अनेक भागांत अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यावर, म्हणजेच हिवाळ्याच्या काळात झालेला हा पाऊस दुर्मीळ मानला जात असून, यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावण्याची भीती निर्माण झाली आहे.
बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागातील शेतीमध्ये घेतलेली कडधान्य पिके—विशेषतः मसूर, मोहरी, हरभरा व वटाणा—या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता असून, पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सांबरा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अनपेक्षितपणे सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणातील बदलांबाबत चर्चा रंगू लागल्या असून, वर्षभर ‘वरुणराजा’ बरसणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः मसूर पिकाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अनपेक्षितपणे सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणातील बदलांबाबत चर्चा रंगू लागल्या असून, “पावसाचा तरी काय भरोसा नाही” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अचानक ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी, अशा बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक दोघेही संभ्रमात आहेत.
विशेषतः मसूर पिकाला या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास रब्बी पिकांचे नुकसान वाढण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.





