बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात व्हॉट्सअॅपद्वारे फसवणुकीचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला आहे. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त असल्याचे भासवत एका अज्ञात व्यक्तीने उपायुक्त उदयकुमार तलवार यांच्याकडे ₹५० हजारांची मागणी केली.
फसवणूक करणाऱ्याने आयुक्त कार्तिक एम. यांचा फोटो डिस्प्ले पिक्चर म्हणून वापरून बनावट क्रमांकावरून उपायुक्तांना संदेश पाठवला. “मी सध्या बैठकीत आहे, तातडीने पैसे ट्रान्सफर करा,” असे सांगत त्याने पैसे पाठवण्याचा स्क्रीनशॉटही शेअर केला.
मात्र संशय आल्याने उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी तात्काळ थेट आयुक्त कार्तिक एम. यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली. आयुक्तांनी कोणतीही रक्कम मागितली नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर या प्रकरणाची तक्रार बेळगाव सीईएन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे व फोटो वापरून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे





