बेळगाव लाईव्ह : खादरवाडी गावाच्या हद्दीत प्रस्तावित करण्यात आलेल्या कचरा डेपो (Garbage Depot) प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर कचरा डेपो स. नं. २२२/१ या जागेत उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडण्यात आला असून, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना अथवा सूचना न देता निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खादरवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन सादर करून हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सदर जागा कचरा डेपोसाठी पूर्णपणे अयोग्य असून यामुळे गावातील पर्यावरण, आरोग्य आणि सार्वजनिक जीवनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी चार प्रमुख मुद्द्यांवर आक्षेप नोंदविला आहे. प्रस्तावित जागेच्या अगदी जवळ जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे दोन तलाव असून याच ठिकाणाहून गावातील जनावरे वर्षभर पाणी घेतात. कचरा डेपो झाल्यास हे पाणी दूषित होऊन जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच प्रस्तावित जागेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या शाळेत गावातील व बाहेरील मिळून सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी व प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.याशिवाय शाळेजवळच गावाची दाट नागरी वस्ती असून कचरा डेपो उभारल्यास नागरिकांच्या पर्यावरण हक्कांचा आणि ‘स्वच्छ वातावरणाचा अधिकार’ यांचा भंग होईल. यामुळे विविध आजार पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

सदर जागा ही गावातील मुलांसाठी खेळण्याचे मैदान तसेच जनावरांच्या चरण्यासाठी एकमेव ठिकाण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या परिसराच्या १०० मीटर अंतरात हिंदू आणि मुस्लिम समाजाची स्मशानभूमी असल्याने अशा पवित्र आणि सार्वजनिक वापराच्या ठिकाणी कचरा डेपो उभारणे पूर्णतः अयोग्य असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
गावाला वस्ती लागून असल्याने भविष्यात हवा आणि पाणी दोन्ही दूषित होऊन गावाचे आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन कचरा डेपोचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा व गावापासून दूर पर्यायी जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




