बेळगाव लाईव्ह : “आपल्याला वाढवण्यासाठी आई-वडील स्वतःच्या सुखाचा त्याग करतात, मात्र आजची तरुण पिढी पाश्चात्य संस्कृती आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन त्यांनाच विसरत चालली आहे,” अशा शब्दांत प्रसिद्ध समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांनी तरुणाईला अंतर्मुख केले.
श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आज, शनिवारी आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हंकारे यांनी मांडलेल्या प्रभावी विचारांमुळे उपस्थित हजारो विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘विद्यार्थ्यांना वाढवताना आई-बाबांना होणाऱ्या वेदना’ हा होता. आजची तरुण पिढी शारीरिक आणि मानसिक दडपणाखाली वावरत असून आत्महत्या, व्यसनाधीनता आणि नैतिक अध:पतन यांसारख्या समस्यांना बळी पडत आहे. या पार्श्वभूमीवर हंकारे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजणे काळाची गरज आहे. समाजातील ही पोकळी भरून काढण्यासाठीच अशा प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला बेळगाव शहरातील विविध महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. आरपीडी मैदानावर झालेला हा कार्यक्रम तरुणाईला एक नवी दिशा देणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान जेव्हा हंकारे यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे आणि त्यांच्या अपेक्षांचे वास्तव मांडले, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या चुकांची जाणीव झाल्याचे सांगत, आतापासून पालकांचा सन्मान आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
वसंत हंकारे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत तरुणांमधील वाढत्या आत्महत्या आणि दिशाहिनतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, संस्कार आणि धर्मरहित जीवन जगल्यामुळे तरुणाई भरकटत आहे. पालकांचे दुर्लक्ष आणि मुलांचे वाढते स्वातंत्र्य यामुळे कौटुंबिक विण विस्कटत चालली आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या आठवणीने अश्रूंना अनावर वाट करून दिली. “आम्ही इतके दिवस मोबाईल आणि मित्र-मैत्रिणींच्या जगात आई-वडिलांच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले,” अशी प्रांजळ कबुली यावेळी काही विद्यार्थ्यांनी दिली.





