बेळगाव लाईव्ह : शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बेळगाव वाहतूक पोलिसांनी रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत फूटपाथ, मुख्य रस्ते, बाजारपेठा व वर्दळीच्या चौकांमध्ये बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर, हातगाड्यांवर, तसेच दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
काही व्यावसायिकांनी आपले साहित्य थेट रस्त्यावर ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता.
गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत सुमारे ७० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना न्यायालयात हजर राहून दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे थेट न्यायालयीन नोटिसा देऊन कारवाई करण्याची पद्धत पहिल्यांदाच राबवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील काळातही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच फूटपाथ व रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





