बेळगाव लाईव्ह: अनमोड घाट मार्गावर झालेल्या सलग दोन अपघातांमुळे तब्बल ८ तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत या मार्गावर भीषण ट्रॅफिक जाम निर्माण झाला असून, शेकडो वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोड घाटात एका ट्रकचा ताबा सुटून तो रस्त्याच्या कडेला जाऊन पडला, त्यामुळे संपूर्ण मार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला. या अपघातानंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, दूधसागर मंदिर परिसरात आणखी एक अपघात घडला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला घसरले.
सुदैवाने, या दोन्ही अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला.
या घटनांमुळे अनमोड घाट मार्गावर रात्रीपासून पहाटेपर्यंत भीषण ट्रॅफिक जाम कायम होता.

अनेक प्रवासी तासन्तास रस्त्यावर अडकून राहिले. काहींना पाणी आणि अन्नासाठीही अडचणींचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी दूधसागर परिसरात तातडीने धाव घेतली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, अनमोड घाटासारख्या धोकादायक आणि वळणावळणाच्या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने, वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळून अधिक दक्षतेने वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





