बेळगाव लाईव्ह :उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच मोठी गैरसोय होत असल्यामुळे बेळगाव विमानतळाच्या पूर्वी असलेल्या 13 विमान सेवा ज्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या त्या ताबडतोब पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स कौन्सिल आणि द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनने बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन यांच्याकडे केली आहे.
बेळगावच्या विमान सेवांमध्ये अलीकडच्या काळात मोठी घट झाली असून काही सेवा पूर्णत: बंद झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव ट्रेडर्स कौन्सिल आणि द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन यांच्या आज शुक्रवारी दुपारी सांबरा, बेळगाव येथील विमानतळ संचालक एस. त्यागराजन यांच्याशी झालेल्या बैठकीप्रसंगी उपरोक्त मागणी करण्यात आली. यावेळी व्यापार, उद्योग वाणिज्य तसेच सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या उच्च क्षमतेच्या व महत्त्वाच्या शहरांशी असलेल्या विमानसेवांमध्ये झालेली कपात बेळगाव आणि परिसराच्या आर्थिक तसेच व्यापार व औद्योगिक प्रगतीला खिळ घालणारी ठरत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
विमान संपर्कात घट होत असल्यामुळे प्रादेशिक विकास प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला असून व्यापार वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. विमानसेवा पूर्ववत सुरू करणे, नव्या मार्गांचा समावेश करणे, विमानतळाच्या संभाव्य क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या संदर्भात पंतप्रधान कार्यालय आणि विमान उड्डाण मंत्रालयाला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकी संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना व्यापारी नेते सतीश तेंडुलकर म्हणाले की, बेळगावच्या असलेल्या 13 विमानसेवा बंद झाल्या आहेत. बेळगाव विमानतळाच्या अखत्यारीत सहा सेक्टर होते. येथील विमान सेवेला बेळगावकरांसह प्रवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ज्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास उडान व्याप्तीत (झोन) 2024 मध्ये हवाई प्रवासासाठी बेळगाव विमानतळाचा सर्वाधिक 3 लाख 47 हजार प्रवाशांनी लाभ घेतला होता.

संबंधित विमान सेवांचा बेळगावच्या औद्योगिक, व्यापार शिक्षण वैद्यकीय कृषी वगैरे सर्व क्षेत्रांना फायदा होत होता. तथापि कटकारस्थान केल्याप्रमाणे गेल्या दोन वर्षात टप्प्याटप्प्याने बेळगाव विमानतळाच्या विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. आता येत्या 15 जानेवारीपासून तर बेळगाव विमानतळावरून फक्त दिल्ली, हैदराबाद आणि बेंगलोर या तीनच विमानसेवा उपलब्ध असणार आहेत. परिणामी उद्योजक व्यापारी आणि तिरुपती वगैरे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाणाऱ्या भक्तांची मोठी गैरसोय होऊन त्यांच्यासाठी समस्या निर्माण होणार आहे.
एकंदर बेळगाव हवाई प्रवासाच्या दृष्टिकोनातून मोठ्या संकटात सापडले असून या संदर्भात तात्काळ उपायोजना केली जावी अशी आमची मागणी आहे. या पद्धतीने हवाई दळणवळणापासून वंचित ठेवल्यास ‘बेळगाव शहर’ खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ होणार तरी केंव्हा? याचा स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी विचार करावा. तसेच त्वरित संघटित होऊन बेळगाव विमानतळाच्या रद्द झालेल्या तेरा विमानसेवा पूर्ववत होण्यासाठी आवाज उठवावा, अशी आमची मागणी आहे असे सतीश तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.
तसेच आपल्या भागाचा विकास व्हावा आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी बेळगाव विमानतळाच्या विकासाकरिता आपल्या सुपीक पिकाऊ जमिनी दिल्या आहेत, या संदर्भातील मुद्दा देखील प्रामुख्याने आजच्या बैठकीत आम्ही उपस्थित केला. बेळगाव विमानतळ टर्मिनलचे काम जोमात सुरू असून येत्या मार्चमध्ये ते प्रवाशांसाठी खुले होणार आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले.





