बेळगाव लाईव्ह :
बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर परिसरातील दोन घरांमध्ये तसेच उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिदंबर नगर येथील एका घरात झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी एका आंतरराज्य चोरट्यास अटक करून सुमारे ₹13.50 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जमशेदखान खलीलखान (वय 41, मूळ रहिवासी हैदराबाद, सध्या गोवा) असे असून तो आंतरराज्य स्तरावर चोरीच्या गुन्ह्यांत सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलीस तपासादरम्यान आरोपीकडून 115 ग्रॅम वितळवलेले सोन्याचे दागिने, होंडा अॅक्टिव्हा दुचाकी आणि दोन मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे. आणि बेळगाव शहर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत बक्षीस जाहीर केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





