belgaum

फंडाच्या माध्यमातून ३ कोटींची फसवणूक; पोलीस आयुक्तांकडे तक्रार

0
1028
 belgaum

बेळगाव लाईव्ह :जनता कॉलनी, विजयनगर, बेळगाव येथील श्री गणेश मासिक वार्षिक फंड या फंडाच्या चालकांनी फसवणूक करून आमची सुमारे ३ कोटी रुपयांची रक्कम हडप केली असून संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच आमचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी विजयनगर पहिला स्टॉप येथील रहिवाशांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडे केली आहे.


विजयनगर पहिला स्टॉप येथील रहिवाशांनी मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात जाऊन याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना सादर केले. पोलीस आयुक्त बोरसे यांनी निवेदन स्वीकारून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.


जनता कॉलनी, विजयनगर, बेळगाव येथे २०१८ साली श्री गणेश मासिक वार्षिक फंड स्थापन करणारे दिलीप खाचू नाईक, दर्शन दिलीप नाईक, गीता दिलीप नाईक आणि प्रांजल दर्शन नाईक यांनी सुरुवातीची सहा वर्षे फंडाचा व्यवहार सुरळीतपणे चालवला. मात्र गेल्या एक वर्षापासून फंडधारकांनी भरलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ सुरू झाली असून लोकांना मानसिक त्रास दिला जात आहे.

 belgaum


पैशांची विचारणा करण्यासाठी फोन केल्यास फंडचालक फोन उचलत नाहीत किंवा एकमेकांकडे जबाबदारी ढकलून वेळकाढूपणा करत आहेत. प्रत्यक्ष घरी जाऊन विचारणा केल्यास अर्वाच्य भाषेत अपमान केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दिलीप, दर्शन, गीता आणि प्रांजल नाईक या नाईक कुटुंबीयांनी एकूण सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या फंडामध्ये गरीब मजूर, रोजंदारी कामगार, घरकाम करणारे नागरिकांनी काबाडकष्टाने कमावलेले पैसे गुंतवले असून पैसे परत न मिळाल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व आमची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयनगर पहिला स्टॉप येथील रहिवासी साक्षी पेडणेकर यांनी सांगितले की, सुरुवातीला दिलीप नाईक व दर्शन नाईक यांच्या फंडाचा व्यवहार चांगला असल्याने नागरिकांचा विश्वास बसला होता. मात्र गेल्या वर्षापासून पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू झाली आहे. सध्या दिलीप व दर्शन हे दोघेही बेपत्ता असून फोनही उचलत नाहीत. त्यांच्या घरी गेल्यास दिलीप नाईक यांची पत्नी अर्वाच्य भाषेत बोलून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला.


मी स्वतः सात-आठ वर्षांपासून दरमहा ७ हजार रुपये फंडात भरत होते. मात्र आता पैसे परत मिळत नाहीत. माझ्यासारखे अनेक नागरिक या फंडात पैसे व ठेवी जमा करून बसले असून एकूण रक्कम ३ ते ३.५ कोटी रुपयांपर्यंत जाते, अशी माहिती साक्षी पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, तक्रार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हे फसवणुकीचे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आले असून दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.