बेळगाव लाईव्ह :राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून खादरवाडी गावापर्यंत जाणाऱ्या अप्रोच रस्त्याचा प्रलंबित असलेला विकास तात्काळ केला जावा, या मागणीसाठी खादरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पाटील यांनी ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याच्या बेळगाव क्लब रोड येथील कार्यालयासमोर छेडलेले आमरण उपोषण आज, शनिवारी, तिसऱ्या दिवशीही सुरूच होते.
गावचा महत्त्वाचा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी लोकशाही मार्गाने गेल्या गुरुवारपासून आंदोलन करणाऱ्या राजेश पाटील यांना अद्यापपर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी आज तिसऱ्या दिवशीही आपले आमरण उपोषण बेमुदत सुरूच ठेवले असून, त्यांच्या या आंदोलनाला गावकरी व शेतकऱ्यांनी धरणे सत्याग्रह करत पाठिंबा दिला आहे.
कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास खात्याकडून मंजूर झालेल्या खादरवाडी गावातील प्रमुख रस्त्याचे विकासकाम त्वरेने पूर्ण करण्यात यावे, यासाठी राजेश पाटील व त्यांचे सहकारी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत. यादरम्यान वेळोवेळी अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले असले तरी अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही.
सदर रस्ता अतिशय महत्त्वाचा असून रस्त्यालगत दोन शाळा आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून खादरवाडी गावापर्यंत येणारा हा अप्रोच रस्ता पुढे वेंगुर्ला महामार्गाला जोडला गेल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सध्याच्या खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे विकासकाम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात यावे, यासाठी राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलन तीन दिवसांपासून सुरू असल्यामुळे आज ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याकडून आंदोलनकर्त्यांना चहा, बिस्किटे व इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले; मात्र त्यांनी ते स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

आंदोलनस्थळी बेळगाव लाईव्हसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना राजेश पाटील यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून आणि आता गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावच्या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहोत. तथापि प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
बेळगावात विधानसभेचे अधिवेशन असते त्यावेळी प्रशासन कोणतीही निविदा अथवा मंजुरीची प्रक्रिया न करता ठरावीक रस्त्यांचे नूतनीकरण व दुरुस्ती युद्धपातळीवर करते. हे जर शक्य असेल, तर 5–6 वर्षांपूर्वी विकासासाठी मंजूर झालेल्या खादरवाडीच्या रस्त्याच्या साध्या पॅचवर्कच्या कामासाठी विलंब का केला जात आहे? त्यासाठी आम्हाला जर उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असेल, तर लोकशाहीला काय अर्थ आहे? सद्य परिस्थिती पाहता आपण खरोखरच लोकशाहीत आहोत का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असे त्यांनी सांगितले.
जोपर्यंत आमच्या मागणीची पूर्तता होत नाही आणि रस्त्यासंदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असे राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांनी जाब विचारला असता ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्यावतीने बोलताना सेक्शन ऑफिसर आर. बी. शिवराई यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पासून खादरवाडी गावापर्यंत जाणाऱ्या अप्रोच रस्त्यावर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई करण्यात आल्यामुळे सदर रस्त्याचे प्रलंबित विकासकाम हाती घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, अशी खात्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.




