बेळगाव लाईव्ह : तारांगण, साई प्रतिष्ठान आणि सुमन क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहावे कवयित्री संमेलन शनिवारी शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या माध्यमातून बेळगाव सीमाभागातील महिला साहित्यिकांना आपल्या कविता सादर करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या संमेलनाध्यक्षा डॉ. शोभा नाईक यांच्या उपस्थितीत आणि डॉ. दत्तप्रसाद गिजरे, उद्योजक पीटर डिसूजा, डॉ. स्मिता वडेर व अस्मिता आळतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आयोजित हळदी-कुंकू समारंभाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. संमेलनाध्यक्ष डॉ. शोभा नाईक यांनी आपल्या भाषणात महिलांच्या लेखणीतील सामर्थ्य आणि साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा करण्यात आलेला सत्कार. यामध्ये सिम्बॉयसिस कॉलेजमधून सुवर्णपदक विजेते शिवाजीराव जळगेकर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कवी रवींद्र पाटील, जयश्री पाटील, समृद्धी पाटील, नेहा आळतेकर यांचा गौरव करण्यात आला.

तसेच संरक्षण क्षेत्रात निवड झाल्याबद्दल अक्षता पाटील, साहिल पाटील आणि तन्वी पाटील यांचाही विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला बेळगावमधील महिलांसह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.





