बेळगाव लाईव्ह :लबेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या बेकायदा दारू विक्रीवर ताबडतोब बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेतर्फे कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या मोर्चा बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात संघटनेचे राज्य सरचिटणीस किशन संदी, उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ, जिल्हाध्यक्ष अस्मा जोटदार यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदनामध्ये अबकारी आणि पोलीस खात्याचे सहकार्य व आशीर्वादामुळे बेळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री फोफावली आहे. राजरोस चालणाऱ्या या दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. पहाटे 5 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्याआधी कांही अधिकृत दारू विक्रीच्या दुकानांचे दरवाजे उघडलेले असतात. बेकायदा दारू विक्रीचा प्रतिकूल परिणाम लहान मुलांपासून सर्व थरातील लोकांना सहन करावा लागत आहे.
दारूच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे अपघातांचे तसेच भांडणे, मारामाऱ्यांसह अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी महिलांना लहान वयात वैधव्य प्राप्त होत आहे. करते पुरुष दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आहे. यात भर म्हणून मायक्रो फायनान्स कंपन्यांचा त्रास वाढला आहे. कर्जफेड आणि व्याज वसुलीसाठी मायक्रो फायनान्सचे लोक वेठीस धरत असल्यामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. मायक्रो फायनान्सच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून काहींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून आपले जीवन संपवले आहे.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेकायदा दारू विक्रीला आळा घालून त्या दारूची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे मायक्रो फायनान्सकडून पैसे वसुलीसाठी लोकांना दिला जाणारा त्रास थांबवण्यासाठी शाश्वत उपायोजना करावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अस्मा जोटदार यांनी सांगितले की, मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावच्या एका शेतकरी महिलेने नुकतीच आत्महत्या केली आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचा जाच इतका वाढला की कंपनीचे लोक सकाळी 6 वाजता येणार असे समजताच तिने पहाटे 4 वाजताच आपले जीवन संपवले. फक्त बेळगाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा त्रास, दहशत वाढली आहे. तथापि कर्नाटक राज्य रयत संघ या मायक्रो फायनान्स कंपन्यांना त्याचबरोबर राज्य सरकारला देखील धडा शिकवण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त लोकांसाठी विशेष करून विद्यार्थ्यांसाठी बेळगावहून भेंडीगिरी गावापर्यंतची बस सेवा व्यवस्थित नाही. त्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनी गावामध्ये पोहोचत आहेत. तिथून आसपासच्या आपल्या मूळ गावामध्ये पायी जाण्यासाठी त्यांना रात्रीचे 8 वाजत आहेत. या पद्धतीने रात्री चालत जाताना त्यांच्या बाबतीत काही गैरप्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? सरकार प्रशासन डोळे झाकून बसले आहे का? असा सवाल करून अनिगोळ येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेच्या कुटुंबीयांना सरकारने 25 लाख नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अस्मा जोटदार यांनी केली. या मागणीला शेतकरी नेते किशन संदी व जावेद मुल्ला यांनी देखील दुजोरा देऊन मायक्रो फायनान्सच्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.





