बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील न्यू गांधी नगर परिसरात शुक्रवारी पूर्ववैमनस्यातून दिशांत चावूस या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. मुजम्मील नावाच्या एका आरोपीने हे कृत्य केले असून, तो एका जुन्या खुनाच्या प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिळवून नुकताच बाहेर आला होता.
जखमी झालेला दिशांत चावूस हा तरुण याच परिसरात राहणारा असून, शुक्रवारी दुपारी मुजम्मीलशी त्याचा सामना झाला. मुजम्मीलने जुना राग मनात धरून, ‘तू माझ्याकडे रागाने का बघतोस’ असे म्हणत दिशांतवर अचानक हल्ला चढवला. त्याने दिशांतच्या छातीवर चाकूने खोलवर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी दिशांतला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, जखम खोल असल्याने आणि प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला अतिदक्षता विभागात उपचार देण्यात येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच माळमारुतीचे सीपीआय बी.आर. गड्डेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.




