बेळगाव लाईव्ह : श्रीराम सेना हिंदुस्थान, बेळगाव यांच्या वतीने शनिवार, १० जानेवारी रोजी एका विशेष प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध युवा व्याख्याते आणि समाजप्रबोधनकार वसंत हनकारे हे ‘न समजलेले आई-बाप’ या विषयावर आपले परखड विचार मांडणार आहेत.
टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११:०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वावरणाऱ्या तरुण पिढीमध्ये पालकांविषयीची समज कमी होत चालली आहे,
तसेच पालकांनाही अनेकदा पाल्यांची बदलती मानसिकता समजून घेण्यात अडचणी येतात. हाच वैचारिक दुवा सांधण्यासाठी वसंत हनकारे आपल्या प्रभावी आणि ओघवत्या शैलीत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

समाजामध्ये कौटुंबिक मूल्ये जतन करणे आणि आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव तरुण पिढीला करून देणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश आहे. वसंत हनकारे यांच्या व्याख्यानांमधून नेहमीच समाजप्रबोधनाची नवी दिशा मिळते, त्यामुळे आरपीडी महाविद्यालयात होणाऱ्या या व्याख्यानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीराम सेना हिंदुस्थानने या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. तरी बेळगावमधील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.





