बेळगाव लाईव्ह :खाजगी प्रवासी वाहन चालकाला अर्वाच्च शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या सौंदत्ती येथील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कर्नाटक चालक वक्कुट या संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
बेळगाव चालक वक्कुट संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
सौंदत्ती येथे गेल्या गुरुवारी 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता खाजगी कारचालक शिवानंद अर्जुन कांबळे याला तेथील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी नो-पार्किंगमध्ये वाहन थांबवल्याबद्दल अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यावेळी शिवानंद याने नो-पार्किंगचा फलक नसल्यामुळे आपण आपली कार या ठिकाणी उभी केली असे सांगून चुकीबद्दल माफी मागितली. तेंव्हा आमच्याशी वाद घालतोस काय? अशी विचार न करत पोलिसांनी त्याच्यावर हल्ला करून मारहाण केली.
या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. आमच्या या मागणीची पूर्तता झाली नाही तर आमचे राज्याध्यक्ष जे. नारायण स्वामी आणि बेळगाव जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाईलाजाने आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शिवानंद कांबळे या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कार चालकाने आपल्यावर सौंदत्ती पोलिसांनी केलेल्या अन्यायाची माहिती दिली. त्याचप्रमाणे कर्नाटक चालक वक्कुट या संघटनेच्या इतर सदस्य वाहन चालकांनी देखील सौंदत्ती पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. आम्ही खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक असलो तरी आम्हाला देखील स्वाभिमान आहे. तथापि सौंदत्ती येथील पोलीस साध्या साध्या गोष्टींमध्ये अर्वाच्च भाषा वापरत आम्हाला कस्पटासमान वागणूक देतात.
साहेब शिवीगाळ कशाला करता? अशी विचारना केल्यास तुला मार खायचा आहे का? अशी धमकी दिली जाते. कर्नाटकात महिलांसाठी परिवहन बस सेवा मोफत झाल्यापासून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आम्हा वाहन चालकांवर बिकट प्रसंग ओढवला आहे. ही परिस्थिती असताना सौंदत्तीमध्ये सध्या पोलिसांनी आमचे जगणे मुश्किल केले आहे.
गाडी अडवली की त्यांना 100, 200 रुपये चारावे लागतात. हे असेच सुरू राहिल्यास आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? असा सवाल करून शिवानंद कांबळे याच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही बेंगलोर विधानसौध चलो आंदोलन छेडणार आहोत, असे खाजगी प्रवासी वाहन चालक संतोष अथणी याने सांगितले.





