belgaum

गोव्याचा दुर्मिळ साप बेळगावमध्ये आढळला; अघोरी प्रकाराची शक्यता

0
1544
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शनिवार खुंट, बेळगाव येथील नारळ व्यापारी जसवंत गोरल यांच्या दुकानात गोव्याहून नारळ घेऊन आलेल्या ट्रकमधील शेवटच्या पोत्याखाली एक साप आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच गोरल यांनी तातडीने सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण केले. चिट्टी यांनी सुरक्षितरीत्या साप ताब्यात घेतला.

तपासणीदरम्यान हा साप विटेकर्‍स बोआ (Vitekar’s Boa) या डुरक्या घोणसाच्या उपजातीचा असल्याचे निष्पन्न झाले. हा साप बिनविषारी व दुर्मिळ असून साधारण तीन वर्षांचा व 2 फूट 8 इंच लांबीचा होता. हा साप प्रामुख्याने महाराष्ट्र ते केरळच्या किनारपट्टी भागात आढळतो. भुसभुशीत जमीन, दगड-विटांचे ढिगारे येथे तो वास्तव्य करतो. उंदीर, पाली व सरडे हे त्याचे मुख्य खाद्य असून तो साधारण ६ ते ७ पिल्लांना जन्म देतो.

अघोरी किंवा अंधश्रद्धेचा संशय

साप ताब्यात घेतल्यानंतर त्याची शेपूट कापलेली व तोंड चिकटलेले असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा साप यापूर्वी कोणीतरी हाताळला असण्याची शक्यता चिट्टी यांनी व्यक्त केली. हा साप लोकांमध्ये ‘दुतोंडी मांडूळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सापासारखा दिसत असल्याने, अंधश्रद्धा किंवा अघोरी प्रकारासाठी त्याचा वापर झाला असावा, असा संशयही व्यक्त करण्यात आला.

 belgaum

वनअधिकारी प्रशांत यांच्या सहकार्याने या सापाला पुढे गोव्यातील वनक्षेत्रात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

नागरिकांनी अशा दुर्मिळ व बिनविषारी सापांबाबत भीती न बाळगता तात्काळ वनविभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.