बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर पौष पौर्णिमेनिमित्त म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेसाठी शनिवारी ३ जानेवारी रोजी भरणाऱ्या मुख्य यात्रेसाठी शुक्रवार सकाळपासूनच लाखो भाविक दाखल झाले आहेत. ‘उदो उदो’च्या जयघोषाने आणि भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण डोंगर परिसर भक्तिमय झाला आहे.
या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. शुक्रवार रात्रीपर्यंत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार असून, शनिवारी सकाळपर्यंत संपूर्ण डोंगरावर १० लाखांहून अधिक भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या असून जिल्हा प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
डोंगराकडे जाणाऱ्या उगार, जोगणभावी आणि सवदत्ती सूत गिरणी या मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून अनेक भाविक आपल्या कुटुंबासह बैलगाड्या आणि ट्रॅक्टरमधून आले असून, त्यांनी रस्त्याच्या कडेलाच स्वयंपाकासाठी चुली मांडल्या आहेत. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी ठिकठिकाणी पुरणपोळी आणि विविध पक्वान्ने तयार केली जात आहेत.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यात्रेच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले कि, भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सोयी पुरवण्यासाठी मंदिर विकास प्राधिकरणाने नियोजन केले आहे. विशेषतः महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांना कोणताही त्रास होऊ नये, याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.
यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ४०० होमगार्डसह पोलिसांच्या तुकड्या तैनात असून संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी चार मोठे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.




