belgaum

मानवी सन्मान, उपचार आणि आनंदाचा संगम : हा क्रीडा महोत्सव

0
264
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खेळ म्हणजे केवळ जिंकणे-हरणे नव्हे, तर आत्मविश्वास, आनंद आणि माणूसपण जपण्याचे माध्यम ठरू शकते, याचा प्रत्यय संजीवीनी फाउंडेशनच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात आला. काळजी केंद्रातील रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेला हा क्रीडामहोत्सव स्पर्धेपुरता मर्यादित न राहता मानवी संवेदनांचा, उपचार प्रक्रियेचा आणि पुनर्वसनाचा उत्सव ठरला.

संजीवीनी फाउंडेशनने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रुग्णांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी क्रीडा उपक्रमाचे आयोजन केले होते. खेळाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, रुग्णांमधील न्यूनगंड दूर व्हावा आणि समाजाशी नाते अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ५० हून अधिक रुग्ण-स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

मैदानी स्पर्धांमध्ये थ्रो बॉल, पोत्यात पाय घालून उड्या मारणे, लिंबू-चमचा, १०० मीटर रिले शर्यत आणि सावकाश चालणे या खेळांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत सहभागींची जिद्द, चिकाटी आणि आनंद पाहण्यासारखा होता. विजयापेक्षा सहभागाला अधिक महत्त्व देण्यात आले होते, त्यामुळे प्रत्येक स्पर्धक विजेता असल्याची भावना संपूर्ण मैदानात दिसून आली.

 belgaum

इनडोअर स्पर्धांमध्ये कोलाज निर्मिती, मातीपासून वस्तू तयार करणे, केशरचना आणि संगीत खुर्ची यांसारख्या सर्जनशील स्पर्धांनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. या स्पर्धांमुळे रुग्णांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला.

पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती रोहन जुवळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडत क्रीडामहोत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. संजीवीनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर पाहुण्यांचा परिचय सावित्री माळी यांनी करून दिला.

संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात संजीवीनीच्या कार्याचा मूलगामी विचार मांडला. “क्रीडा स्पर्धा हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर उपचार प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा घटक आहे. खेळामुळे रुग्णांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यात सकारात्मक बदल घडतात,” असे त्यांनी सांगितले. भविष्यात स्वतःच्या वास्तूमध्ये २०० रुग्णांची सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनप्रसंगी उपायुक्त नारायण बरमणी यांनी संजीवीनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना, “मानवी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आणि समाजासाठी प्रेरणादायी काम येथे सुरू आहे. अशा उपक्रमांमुळे रुग्णांना नवी उमेद मिळते,” असे मत व्यक्त केले.
उद्योगपती रोहन जुवळी यांनीही संजीवीनीच्या दूरदृष्टीचे कौतुक करत, बेळगावमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मनोरुग्णांसाठी समर्पणाने काम करणारी संस्था असल्याचा अभिमान व्यक्त केला. समाजाला अशा सेवांची मोठी गरज असून भविष्यात अधिक क्षमतेचे काळजी केंद्र उभारण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

अध्यक्षीय भाषणात चेअरमन मदन बामणे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करत स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. संजीवीनी फाउंडेशनचे प्रत्येक उपक्रम मानवी प्रतिष्ठा जपणारे आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरिता नाईक, पद्मा औषेकर, पुष्पा बेंडवाड, ऋतुजा काटे, अर्चना शिरहट्टी, सुनिल चन्नदासर, संजीवनी पोतदार, अंकिता राजोरे, कावेरी लमानी, गुरुराज हडपद, जमुना कडोलकर, रोहित मंडळे, बसम्मा बेनकट्टी आणि विजयालक्ष्मी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. वैष्णवी नेवगिरी यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाला संचालिका रेखा बामणे तसेच सल्लागार सदस्य डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नवीना शेट्टीगार, संजय पाटील आणि विद्या सरनोबत उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षता अक्कोळे यांनी केले, तर आभार कावेरी नेगी यांनी मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.