बेळगाव लाईव्ह : बेळगावकरांचा अत्यंत आवडीचा व बहुप्रतीक्षित खाद्य महोत्सव ‘अन्नोत्सव २०२६’ याचा दिमाखात शुभारंभ शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अंगडी कॉलेज मैदानावर पार पडला. रोटरी जिल्हा गव्हर्नर रो. अरुण भंडारे यांच्या हस्ते रिबन कापून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर एजी रो. राजेशकुमार तळेगाव, श्रीमती दीपा सिदनाळ, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विनायक नाईक, सचिव रो. डॉ. संतोष बी. पाटील, कम्युनिटी सर्व्हिसेस डायरेक्टर रो. मुकुंद बंग तसेच अन्नोत्सवाचे चेअरमन रो. मनोज मायकल उपस्थित होते.
या महोत्सवात देशभरातून आलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून मुघलाई पदार्थ, कोस्टल सीफूड तसेच भारताच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य अतिथी रो. अरुण भंडारे यांनी रोटरी क्लबच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. अन्नोत्सवातून जमा होणारा निधी सार्वजनिक स्वच्छतागृहे, ‘स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड’ यासह विविध सामाजिक प्रकल्पांसाठी वापरण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

श्रीमती दीपा सिदनाळ यांनीही बेळगावकर वर्षभर वाट पाहत असलेल्या या खाद्य महोत्सवाच्या सातत्यपूर्ण आयोजनाचे कौतुक केले.
उद्घाटनाच्या पहिल्या संध्याकाळी रुशांत यांनी सादर केलेल्या ‘सुफी रेट्रो’ गाण्यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. पुढील काही दिवसांत बॉलिवूड व हॉलिवूड थीमवर आधारित विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या अन्नोत्सवाचा लाभ बेळगावकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रो. विनायक नाईक आणि चेअरमन रो. मनोज मायकल यांनी केले आहे. महोत्सवाची तिकिटे ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली आहे.




