बेळगाव लाईव्ह : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू यासह विविध ठिकाणच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेचा मुख्य सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ‘उदे गं आई, उदे…’ च्या जयघोषाने आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने संपूर्ण डोंगर परिसर भक्तीमय झाला असून, यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी रेणुका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे.
गुरुवारपासून या यात्रेला प्रारंभ झाला असून, शनिवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रेचा मुख्य दिवस होता. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता भाविकांनी मध्यरात्रीपासूनच जोगणभावीमध्ये स्नानासाठी गर्दी केली होती.
त्यानंतर अनवाणी पायाने डोंगर चढून भाविक दर्शनाच्या रांगेत दाखल झाले. दर्शनासाठी सुमारे ४ ते ५ तासांचा कालावधी लागत असला, तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मंदिरात आणि परिसरात भाविकांनी भंडाऱ्याची मोठी उधळण केल्यामुळे संपूर्ण डोंगर पिवळाधमक दिसत आहे.

परंपरेनुसार, बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांतील भाविकांनी एकत्र येऊन ‘सामूहिक पडली’ भरण्याचा विधी श्रद्धेने पार पाडला. अनेक भाविक कडूनिंबाच्या डहाळ्या धारण करून आणि चौंडके वाजवत देवीला दीड नमस्कार घालून आपला नवस फेडताना दिसत आहेत. डोंगर माथ्यावर सध्या भाविकांनी हजारो तंबू ठोकले असून संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, ट्रॅक्टर, खासगी वाहने आणि बसगाड्यांच्या मोठ्या संख्येमुळे सौंदत्तीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गर्दीचा ओघ प्रचंड असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असून वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.





