बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मार्केट पोलीस स्थानक ते कीर्ती हॉटेल दरम्यान पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात चव्हाट गल्ली आणि शेट्टी गल्लीतील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत आवाज उठवला. नागरिकांचा वाढता रोष पाहून आमदार आसिफ सेठ यांनी तातडीने ओल्ड पीबी रोड परिसराला भेट दिली आणि स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
कीर्ती हॉटेल ते बस स्थानक या मार्गावर बॅरिकेड्स लावल्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रत्येक गल्लीच्या प्रवेशद्वारावरच अडथळे निर्माण केल्यामुळे लोकांना लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. हे बॅरिकेड्स तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी किमान मार्ग मोकळा करावा, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी आमदारांकडे केली.
या परिसरात वास्तव्य करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना या चुकीच्या नियोजनाचा मोठा फटका बसत आहे. शारीरिक अडचणींमुळे त्यांना मोठा वळसा घालणे कठीण होत असून, प्रशासनाने कोणताही विचार न करता घेतलेल्या या निर्णयावर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या भागात तीन नगरसेवक असतानाही कोणालाही विश्वासात न घेता ही कारवाई केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला.

बॅरिकेड्स लावताना रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवांचा विचार करण्यात आलेला नाही. कोणत्याही दिशादर्शक फलकाशिवाय करण्यात आलेल्या या नियोजनामुळे चारही गल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर गोंधळ निर्माण झाला आहे. जर एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांच्या समस्या आणि आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन आमदार आसिफ सेठ यांनी तातडीने पोलीस विभागाशी संपर्क साधला. बॅरिकेड्समुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि व्यापारावर होत असलेल्या परिणामांची माहिती घेत, यावर लवकरात लवकर सोयीस्कर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.





