बेळगाव लाईव्ह : बेळगावातील वादग्रस्त ‘खाऊ कट्टा’ प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी दाखल केलेली याचिका क्र. 19069/2025 मंजूर केली असून बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांची अपात्रता रद्द केली आहे. हा आदेश 13 जानेवारी 2025 रोजी पारित करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांनी ॲड. शिवप्रसाद शांतनगौडर यांच्यामार्फत कर्नाटक महानगरपालिका अधिनियम, 1976 च्या कलम 26(1)(के) अंतर्गत दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला आव्हान दिले होते. या अपात्रतेच्या आदेशाला बंगळूरच्या नगरविकास विभाग प्रधान सचिवांनी कायम ठेवले होते.
ज्याद्वारे बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांच्या पूर्वीच्या निर्णयाची पुष्टी करण्यात आली होती. राज्याची बाजू अतिरिक्त महाधिवक्ता यांनी, तर तक्रारदाराची बाजू वरिष्ठ वकील ॲड. अनंत मंडगी यांनी मांडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने गोवावेस, बेळगाव येथे बांधलेल्या राणी चेन्नभैरदेवी महिला बाजाराचा “तिनिसू कट्टे – खाऊ कट्टा” येथील दुकाने लिलावाद्वारे मिळवण्यासाठी याचिकाकर्त्यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती.
तथापि, दुकानांच्या वाटपासाठीचा लिलाव 2020 मध्ये झाला होता, तर महानगरपालिकेच्या निवडणुका सप्टेंबर 2021 मध्ये झाल्या आणि याचिकाकर्त्यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये नगरसेवक म्हणून शपथ घेतली होती.
थोडक्यात लिलावाच्या वेळी याचिकाकर्ते नगरसेवक नसल्यामुळे पदाचा गैरवापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने कलम 26(1)(के) च्या तरतुदी लागू होत नाहीत, असा निर्णय दिला. परिणामी, न्यायालयाने अपात्रतेचे आदेश रद्द करण्याद्वारे जयंत जाधव व मंगेश पवार यांना संपूर्ण दिलासा दिला आहे.





