बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांचा वाढता भार आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे.
शहरातील मुख्य चौकांमध्ये खासगी बसमुळे होणारी अडवणूक थांबवण्यासाठी चार पर्यायी थांबे निश्चित करण्यात आले असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयुक्तालयात आयोजित बैठकीत बस मालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सद्यस्थितीत शहरातून ७९ हून अधिक खासगी बस विविध राज्यांत धावतात. मात्र, आरटीओ कार्यालय आणि रामदेव सर्कल यांसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या बस उभ्या करून प्रवासी भरले जात असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेषतः शनिवार आणि रविवारी या भागांत परिस्थिती गंभीर होते. यावर तोडगा म्हणून आता भरतेश कॉलेजच्या बाजूला, धर्मनाथ सर्कल आणि महामार्गाला लागून असलेल्या मोकळ्या जागांवर हे थांबे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमांमुळे शहरातील अंतर्गत रस्ते मोकळे होतील आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत खासगी बस चालकांच्या अडचणी समजून घेतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त निरंजनराजे अर्स, साहाय्यक पोलीस आयुक्त ज्योतिबा निकम, पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी यांच्यासह शहर वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





