बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने बेळगावच्या विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाने आरोपीला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण भीमराव अबुबाईगोळ (वय २३, रा. बेळवी, ता. हुक्केरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
२०२१ मध्ये हुक्केरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेले होते आणि तिच्यावर अत्याचार केला होता. हुक्केरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर पार पडली. सरकारी अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे प्रबळ युक्तिवाद केला.
एकूण ११ साक्षीदार आणि ४८ कागदपत्रांच्या आधारे आरोपीवरील आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीला २० वर्षांचा कारावास आणि १ लाख १८ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त २ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल.
तसेच पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले असून, ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.





