बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात वाढत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या संकल्पनेतून ‘Locked House Beat System’ ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, जे नागरिक काही दिवसांसाठी शहराबाहेर जाणार असतील, त्यांनी आपल्या घराचा पत्ता, लोकेशन पिन आणि गैरहजेरीचा कालावधी बेळगाव शहर पोलिस कंट्रोल रूमच्या WhatsApp क्रमांकावर पाठवायचा आहे.
📱 WhatsApp क्रमांक : 8277951146
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की,
नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ त्या भागातील रात्रीच्या गस्तीत असलेल्या बीट पोलिस कर्मचाऱ्यांनाच दिली जाणार आहे.

रात्री १ ते ५ या वेळेत, जेव्हा घरफोडीचे प्रमाण जास्त असते, त्या कालावधीत किमान दोन वेळा संबंधित घराजवळ पोलिसांची भेट व तपासणी केली जाणार आहे.
या उपक्रमामुळे घर बंद असतानाही त्यावर पोलिसांचा थेट पहारा राहणार असून, चोरट्यांना मोठा धक्का बसणार आहे.
नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या घराच्या सुरक्षेसाठी पोलिसांशी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.





