बेळगाव लाईव्ह : मतिमंद आणि अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बेळगावच्या तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. हुसेनसाब इमामसाब नदाफ ऊर्फ पिंजारा असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, २६ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता रामदुर्ग तालुक्यातील चिप्पलकट्टी गावात ही संतापजनक घटना घडली होती. पीडित मुलगी ही मतिमंद आहे आणि ती हिंदू अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे.
आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. या प्रकरणी कटकटोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन तपास अधिकारी तथा रामदुर्गचे डीएसपी रामनगौडा ए. हट्टी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी तिसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सविताकुमारी एन. यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एल) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड, तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.
या महत्त्वपूर्ण खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आर. जी. देवरेड्डी यांनी प्रभावीपणे काम पाहिले. त्यांनी मांडलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला समाजासाठी आदर्श ठरेल अशी कठोर शिक्षा सुनावली आहे.





