बेळगाव लाईव्ह : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील कृत्यास भाग पाडणाऱ्या नराधमाला बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विनायक कलगौडा पाटील (वय ३०, रा. नेर्ली, ता. हुक्केरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाचा तपास गोकाकचे डीएसपी डी. एच. मुल्ला यांनी केला होता. आरोपीने नोव्हेंबर २०२३ मध्ये पीडित मुलीला गाठून तिचा विनयभंग केला होता, इतकेच नव्हे तर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून तिची छळवणूक केली होती.
याप्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण विशेष पोक्सो न्यायालयात चालवण्यात आले. न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत विविध कलमान्वये ५ वर्षांचा कारावास आणि एकूण ३३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूदही न्यायालयाने केली आहे. तसेच पीडित मुलीला दिलासा देण्यासाठी जिल्हा कायदे सेवा प्राधिकरणाकडून १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्यात विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केला.





