बेळगाव लाईव्ह:अल्पवयीन मुलीवर लैंगिक कृत्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा जिल्हा पोस्को विशेष न्यायालय-१, बेळगाव यांनी सुनावली आहे.
या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 68/2025 अन्वये बी.एन.एस. कायदा 2023 मधील कलम 75(2), 115(1), 351(2) तसेच पोस्को कायदा 2012 मधील कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी विशेष खटला क्रमांक 291/2025 अंतर्गत करण्यात आली.
फिर्यादीची मुलगी ही अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही आरोपी आजाद महबूब सुभानी किल्लेदार (वय 31), रा. तिगडी, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव याने 31 मार्च 2025 रोजी पीडित मुलीचा छळ करून धमकावल्याचा आरोप होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुरुराज कलबुर्गी (बैलहोंगल) यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोस्को न्यायालय-१, बेळगाव यांच्या समोर सुनावणीदरम्यान एकूण 4 साक्षीदार, 17 कागदपत्रे व पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याचे आढळून आले.
त्यानुसार माननीय न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीस पोस्को कायद्याच्या कलम 8 अन्वये ५ वर्षांची सक्तमजुरी व १०,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तसेच पीडित मुलीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले असून, ती रक्कम पीडित मुलगी सज्ञान होईपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता एल. व्ही. पाटील (बेळगाव) यांनी प्रभावी युक्तिवाद केला.




