बेळगाव लाईव्ह :विविध प्रश्नांवर लेखणी द्वारे आवाज उठवणे,सामाजिक कार्याला योग्य न्याय आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य पत्रकार अखंडितपणे करत असतात असे प्रतिपादन माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी बोलताना केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो.बेळगावातही बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रोत्साह फाउंडेशन तसेच सिद्धार्थ बोर्डिंग यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात भारती श्रमजीवी पत्रकार संघ (दिल्ली) सचिव,बेळगाव मीडिया असोसिएशनचे प्रमुख पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोत्साह फाउंडेशनचे कार्यवाह संतोष होनगल, सिद्धार्थ बोर्डिंगचे संचालक हिरालाल चव्हाण, सुरेंद्र देसाई,संजय चौगुले तसेच उमेश राऊळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना संतोष होनगल म्हणाले, समाजातील व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचे काम, त्याचबरोबर देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम पत्रकार करत असतात.देशाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. याचा विचार करून शासन आणि समाजानेही पत्रकारांच्या समस्यांचा गंभीरपणे विचार करावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरेंद्र देसाई,हिरालाल चव्हाण यांनीही समायोजित विचार व्यक्त करताना, बेळगावातील सर्व मराठी पत्रकारांना भावी कार्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.एस आर.कांळे यांनीही यावेळी समयोचीत विचार मांडताना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.





