belgaum

पास्टोली येथे जंगली डुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

0
369
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पास्टोली (ता. खानापूर) येथे आज मंगळवार, दि. 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास जंगली डुकराच्या हल्ल्यात एका महिलेला गंभीर दुखापत झाली. सदर महिला आपल्या शेताकडे जात असताना जंगलातून अचानक आलेल्या जंगली डुकराने तिला उचलून फेकल्याने तिच्या पायाला व कमरेला गंभीर मार बसला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पास्टोली येथील अश्विनी श्रीकांत पाटील या अन्य दोन महिलांसह उन्हाळी भात (वायंगण) पिकाच्या लागवडीसाठी शेतातील रोपे आणण्यासाठी जात होत्या. रस्त्यावर दोघी महिला पुढे चालत असताना काही अंतरावर मागून अश्विनी पाटील येत होत्या. त्यावेळी जंगलातून अचानक दोन जंगली डुक्कर बाहेर आले. त्यापैकी एका डुकराने अश्विनी पाटील यांना जोरदार धक्का देत उचलून फेकले. या हल्ल्यात त्यांच्या गुडघ्याला, पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाली. तसेच गुडघ्याजवळ डुकराचा सुळा लागल्याने हाड निसटल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती “आपलं खानापूर”चे संपादक दिनकर मरगाळे यांनी लोंढा वन विभागाचे आरएफओ वाय. पी. तेज यांना दिली. माहिती मिळताच लोंढा वन विभागाचे आरएफओ वाय. पी. तेज व भीमगड अभयारण्याचे आरएफओ सय्यदसाब नदाफ यांनी तातडीने वन खात्याचे कर्मचारी व दोन वाहने घटनास्थळी रवाना केली. जखमी महिलेला तत्काळ खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

 belgaum

यावेळी भीमगड वन विभागाचे आरएफओ सय्यदसाब नदाफ, लोंढा वन विभागाचे मंजुनाथ एस. कट्टी, येगाप्पा कलशेट्टी तसेच भीमगड वन विभागाचे पुंडलिक पुमार उपस्थित होते. प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जखमी महिलेला बेळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडित ओगले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस केली व तिला धीर दिला.

जंगली प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.