बेळगाव लाईव्ह: साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील आपल्या अद्वितीय सेवाभावाने आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केलेल्या डॉ. प्रभाकर कोरे यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार घोषित केला असून ही बाब समस्त बेळगावसाठी अभिमानाची आहे.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानत ग्रामीण व मागास भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. केएलई संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय, तांत्रिक, वैद्यकीय संशोधन, अभियांत्रिकी तसेच सामान्य शिक्षण क्षेत्रात अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे.
शिक्षणाबरोबरच साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांच्या संवर्धनातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण, संस्कृती आणि मानवतेचे महत्त्व तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यात त्यांची भूमिका अत्यंत प्रशंसनीय आहे. शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता समाजनिर्मितीसाठी उपयुक्त असावे, ही त्यांची भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे.
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या या कार्याची दखल घेऊन देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांच्या सेवेचा सन्मान असून तो भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत केएलई संस्थेच्या संपूर्ण परिवारासह अनेक मान्यवरांनी व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.





