बेळगाव लाईव्ह विशेष :बेळगावचा मराठा समाज म्हणजे संघर्षाशी नाळ जुळलेला समाज. लढाऊ वृत्ती, दिलदारपणा आणि जिगरबाजपणा हे त्याचे जन्मजात गुण. लाथ मारेल तिथे पाणी काढणारा, पळत्या काळालाही मुठीत पकडणारा हा समाज. पण काळाचा प्रवाह बदलत गेला. भूमिपुत्र हळूहळू भूमिहीन होत गेला. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही; शिक्षणात आरक्षण नाही, नोकरीत संरक्षण नाही—अशा दुहेरी कात्रीत मराठा समाज अडकत गेला. या सामाजिक वास्तवाने समाजावर दिशाहीनतेचा शापच जणू बसला.
या अवस्थेत समाजाला गरज होती ती कणखर, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची—जे समाजाला एकत्र बांधेल, त्याच्या प्रश्नांना व्यासपीठ देईल आणि विकासाच्या दिशेने ठोस मांडणी करेल. याच जाणिवेतून मराठा समाजाने मोठा मोर्चा काढला. कर्नाटक सरकारच्या नजरेत समाजाची एकजूट ठळकपणे आली. मोर्चा निघाला, समाज एक झाला; पण प्रश्न राहिला तो या एकीला सातत्य देणाऱ्या नेतृत्वाचा. थकलेल्या, उपेक्षित समाजाला नवी दिशा देणारे नेतृत्व त्या क्षणी काळाची गरज बनले.
याच काळात ‘किरण जाधव’ हे नाव मराठा समाजाच्या आशेचे केंद्रबिंदू बनू लागले. कोणत्यातरी पक्षाशी निष्ठा ठेवत असतानाही ‘आपला समाज’ ही भावना प्राधान्याने जपणारे हे नेतृत्व ठाम ध्येय घेऊन पुढे आले. समाजाच्या प्रश्नांशी स्वतःला घट्ट जोडून घेत त्यांनी कार्याला सुरुवात केली. ज्यांच्याकडे एकेकाळी दुर्लक्षाने पाहिले जात होते, त्यांच्याकडूनच उद्याची अपेक्षा निर्माण झाली—ते नाव म्हणजे किरण जाधव.

भाजपच्या कर्नाटकातील अंतर्गत वादळांच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान भाजप कार्यकर्ता म्हणून किरण जाधवांनी निवडणूक लढवली. त्या काळात मराठी माणसाचा भाजपमधील ठळक चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजकीय लढाईत उडी घेतली. अंतर्गत फुट, अपक्ष उमेदवारांची गर्दी आणि गुंतागुंतीची राजकीय समीकरणे यामुळे निवडणुकीत यश मिळाले नाही; मात्र भाजपमधील मराठा समाजाचा आश्वासक, विश्वासार्ह चेहरा म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाऊ लागले.
मराठा समाजाच्या अडीअडचणी असोत, अन्यायाविरुद्धचा लढा असो किंवा व्यक्तिगत प्रश्न—‘कुणाकडे जावे?’ या प्रश्नाचे उत्तर हळूहळू एकच ठरू लागले: किरण जाधव. उच्चशिक्षित, यशस्वी व्यावसायिक आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी विश्वासार्हतेची पायाभरणी केली.
आज बेळगावमध्ये मराठा समाजाचे नेतृत्व करणारा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला, तर भाजपमध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे किरण जाधव. शांत, संयमी स्वभाव; स्पष्ट दिशा; योजनाबद्ध कार्यक्रम आणि स्वच्छ प्रतिमा—ही त्यांची खरी ताकद. कोणाच्याही अडचणीला धावून जाणारा, हक्कासाठी ठाम उभा राहणारा ‘आपला माणूस’ अशी ओळख त्यांनी समाजमनात खोलवर रुजवली आहे.
म्हणूनच प्रत्येक पक्षाला ‘आपला माणूस’ हवा असतो. आणि भाजपमध्ये मराठा समाजाचा ‘आपला माणूस’ म्हणून किरण जाधव हे नाव आता लपून राहिलेले नाही—ते ठामपणे, उघडपणे पुढे आलेले वास्तव आहे. आज 12 जानेवारी युवा दिवस त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस आहे या रोजी या मराठा नेत्याला टीम बेळगाव लाईव्ह कडून मन:पूर्वक शुभेच्छा!





