बेळगाव लाईव्ह: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आवाज उठवलेला मत चोरीचा मुद्दा देशभर आंदोलनाचे स्वरूप घेत होता. यामुळे जनता जागरूक होत असून, आपल्याला होऊ घातलेल्या कडाक्याच्या विरोधापासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना (नर्रेगा) मधून गांधीजींचे नाव हटवून जनतेला नव्या वादात गुंतवले आहे, असा आरोप एआयसीसीचे सचिव गोपीनाथ पलनियप्पन यांनी केला.
नर्रेगा दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी रविवारी बेळगाव येथील काँग्रेस भवनासमोर आयोजित एकदिवसीय उपवास सत्याग्रहाचे नेतृत्व करताना ते बोलत होते. पलनियप्पन म्हणाले,
“महात्मा गांधींची प्रथम हत्या नथुराम गोडसेने केली. आता आरएसएसचे लोक सत्तेत येऊन नर्रेगामधील गांधीजींचे नाव काढून टाकत त्यांची दुसऱ्यांदा हत्या करत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “नर्रेगा योजनेत दुरुस्ती करताना गांधीजींच्या नावाऐवजी ‘राम’ हे नाव आणण्यात आले आहे.

आम्हाला भगवान रामांविषयी कोणताही आक्षेप नाही. आम्हीही रामावर श्रद्धा ठेवतो. मात्र, राम गांधीजींच्या हातात असतील तर सर्व काही योग्य मार्गाने चालते, त्या रामावर आमचा विश्वास आहे. पण तोच राम जर भाजपच्या हातात गेला, तर काय काय होऊ शकते, याचे उदाहरण मोदी आणि शाह यांनी गुजरातमध्ये काय केले, याचा इतिहासच सांगतो. त्यामुळेच गांधीजींच्या नावासहच ही योजना पुढे सुरू ठेवावी, अशी आमची ठाम मागणी आहे.”
यावेळी बोलताना बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, “भाजप देवाला बाजारात बसवून विकण्याचे काम करत आहे. आम्ही कोणत्याही देवाचा विरोध करत नाही. आम्हालाही देव हवेत. मात्र, भाजप देवाच्या नावावर जे मार्केटिंग करत आहे, त्याला आमचा विरोध आहे. नर्रेगामधून गांधीजींचे नाव काढून रामाचे नाव ठेवले. त्यांनी गोडसेचे नाव ठेवायला हवे होते; चुकून रामाचे नाव ठेवले,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.




