बेळगाव लाईव्ह :बेळगावसह सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर होत असलेल्या कथित भाषिक अत्याचार व लोकप्रतिनिधींवर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) पत्राद्वारे पाठविण्यात आले.
महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी लादलेल्या प्रवेश निर्बंधांविरोधात योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र काही कन्नड संघटनांनी प्रशासनावर दबाव टाकून हे निर्बंध केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव लादल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे नमूद करत मराठी भाषिक नागरिकांचे म्हणणे लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९५६ सालच्या भाषावार राज्यपुनर्रचनेपासून सीमाभागातील मराठी भाषिक समाज शांततामय व घटनात्मक मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीसह विविध संघटनांनी नेहमीच संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन केले असून, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे कोणतेही उदाहरण नाही.
याउलट, जिल्ह्याबाहेरील काही संघटनांच्या कारवायांमुळे तणाव निर्माण होतो आणि त्याचा फटका मराठी भाषिक नागरिकांना सहन करावा लागतो, असा आरोप करण्यात आला आहे. प्रशासन, शिक्षण व सार्वजनिक क्षेत्रात भाषिक भेदभाव होत असल्याची भावना मराठी भाषिक समाजात निर्माण झाली असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

तसेच, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी बेळगावला भेट देण्याचा प्रयत्न करताच कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून त्यांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात येतात. ही बाब लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकनिर्वाचित प्रतिनिधींच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, लोकप्रतिनिधींवरील निर्बंधांची चौकशी करावी, तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनाने निष्पक्ष व संविधानाशी सुसंगत भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच राष्ट्रीय व राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांचे भाषिक, सांस्कृतिक व लोकशाही हक्क सुरक्षित ठेवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि सरचिटणीस मनोहर हुंदरे यांच्या सह्या आहेत.




