बेळगाव लाईव्ह : संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात १९५६ मध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच सीमाप्रश्नासंदर्भातील सुनावणी, कन्नड संघटनांचा सुरु असलेला हैदोस अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बेळगावमधील रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेसमध्ये आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरुवातीला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बेळगावमधील मराठी जनता गेली अनेक वर्षे या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. यंदाही सर्व मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन हुतात्म्यांना वंदन करावे. . संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात १९५६ मध्ये बलिदान दिलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी १७ जानेवारी रोजी बेळगावात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. यावर्षी देखील हुतात्मा चौक येथे सकाळी ९:३० वाजता सर्व मराठी भाषिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी फलक, मराठी भाषा आणि मराठी नेत्यांविरुद्ध विनाकारण आकांडतांडव करणाऱ्या कन्नड संघटनांना जशास तसे उत्तर देण्यासाठी बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात यावा, यासंदर्भात कार्यकर्त्यांनी या बैठकीत मते मांडली.. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने या संदर्भात तातडीने व्यापक बैठक बोलावून मोर्चाची तारीख आणि रुपरेषा निश्चित करावी, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली.

सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल समिती नेते प्रकाश मरगाळे यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. सीमा प्रश्न तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीमध्ये नेमके कोण कार्यरत आहे, याची माहिती स्वतः वकिलांकडेच नाही, हे सीमाभागाचे दुर्दैव आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या भरवशावर न राहता सीमावासीयांनी स्वतःच्या ताकदीवर हा लढा लढवणे गरजेचे आहे, येत्या दोन दिवसांत सीमा प्रश्नाचे काम पाहणाऱ्या कनिष्ठ आणि ज्येष्ठ वकिलांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती प्रकाश मरगाळे यांनी बैठकीत दिली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तरुणांना आवाहन करताना म्हटले की, १७ जानेवारी रोजी सर्व मराठी भाषिकांनी हुतात्मा चौकात उपस्थित राहून आपली लोकइच्छा आणि सीमा प्रश्नी असलेली तीव्रता प्रशासनाला दाखवून द्यावी. अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सीमा समितीवरही निशाणा साधला. ही समिती सीमा प्रश्न विरोधी काम करत असून ती तातडीने बरखास्त करण्यात यावी, असा ठराव समितीने मांडावा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबद्दल सविस्तर माहिती देणारा पत्रव्यवहार करावा, अशी सूचना कार्यकर्त्यांनी केली.
या बैठकीला रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, शिवराज पाटील यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





