बेळगाव लाईव्ह :
शहरातील मोठ्या व वर्दळीच्या बाजारांपैकी एक असलेल्या खासबाग सर्कल येथील आठवडा बाजारात शिस्त आणण्यासाठी पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. दर रविवारी भरणाऱ्या या बाजारात वाढती गर्दी, वाहतूक कोंडी तसेच मोबाईलसह लहान-मोठ्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांत नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक एसीपी निकम यांनी रहदारी पोलिसांसह खासबाग बाजाराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे हेही उपस्थित होते. पाहणीदरम्यान बाजारातील अव्यवस्था, रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे फेरीवाले, नियमबाह्य मांडणी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या समस्या यांचा आढावा घेण्यात आला.
खासबाग बाजार हा शहरातील मोठा बाजार म्हणून ओळखला जात असून येथे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र बेशिस्त मांडणीमुळे बाजारात चालणेही कठीण होत असून त्याचाच फायदा घेत चोरट्यांकडून मोबाईल चोरीसह विविध चोरीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावेळी बोलताना ट्रॅफिक एसीपी निकम यांनी सांगितले की, “एकदा भाजी व इतर लहान-मोठ्या विक्रेत्यांना ठराविक जागांचे मार्किंग करून दिल्यानंतर बाजारात कडक शिस्त लावण्यात येईल. प्रत्येक व्यापाऱ्याने लाईन शिस्त पाळणे बंधनकारक राहील.” तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरसेवक रवी साळुंखे यांनीही बाजारात शिस्त आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना सुरक्षितपणे चालता-फिरता यावे, वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि चोरीचे प्रकार रोखले जावेत, यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लवकरच भाजी व इतर विक्रेत्यांना ठराविक जागांचे मार्किंग करून देण्यात येणार असून त्यानंतर खासबाग बाजारात शिस्तबद्ध व्यवस्था लागू केली जाणार आहे. या कारवाईमुळे बाजार अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित व नागरिकांसाठी अनुकूल बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




