बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती न्यायालयाने (पोक्सो न्यायालय-१) ३० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. निंगप्पा ऊर्फ विशाल भैरप्पा होसमनी (वय २३, रा. समर्थ नगर, बेळगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, आरोपीने २२ एप्रिल २०२२ रोजी अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून नेऊन बेकायदेशीरपणे डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर २१ एप्रिल २०२४ ते १३ मे २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची फिर्याद मार्केट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय महांतेश मठपती यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता, तर सीपीआय महांतेश के. धामण्णवर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या प्रकरणाची सुनावणी विशेष जलदगती न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले, तर ५१ कागदपत्रे आणि २ महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील गुन्हे सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत ३० वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी २ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे.
न्यायालयाने पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे काम पाहिले आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला.





