बेळगाव लाईव्ह :मराठी भाषेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांच्या वतीने काढण्यात येणारी मराठी सन्मान (शिवसन्मान) यात्रा थेट छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या किल्ले रायगडावरून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बेळगाव येथील मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत प्रथम 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यासह संघटनेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात 26 जानेवारी 2026 रोजी, प्रजासत्ताक दिनी किल्ले रायगडावरून करण्याचा निर्णय घेण्यात आला. किल्ले रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेले आणि प्रत्येक मराठी माणसासाठी स्वराज्याची राजधानी मानले जाणारे ऐतिहासिक स्थळ आहे.
26 जानेवारी हा स्वतंत्र भारताचा लोकशाही दिवस असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस आहे. मात्र सीमाभागात गेल्या 70 वर्षांपासून कर्नाटक सरकारकडून या संविधानाची सातत्याने पायमल्ली होत असल्याची भूमिका युवा समितीने बैठकीत मांडली.

युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12 जानेवारी रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे मराठी सन्मान यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली. या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
▪️ कार्याध्यक्ष : धनंजय पाटील – 7899094108
▪️ सरचिटणीस : मनोहर हुंदरे – 9945346640
▪️ उपाध्यक्ष : नारायण मुचंडिकर – 9741289806
या बैठकीस अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर यांच्यासह अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, सागर सांगावकर, अभिजीत मजुकर, इंद्रजीत धामणेकर, सुधीर शिरोळे, रमेश माळवी, सुरज जाधव, राजू पाटील, अभिषेक कारेकर, प्रवीण नावगेकर, रिचर्ड अंथोनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





