बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नी जागृती करण्यासाठी ‘मराठी सन्मान यात्रे’ची घोषणा महिनाभरापूर्वी करण्यात आली होती. या संकल्पनेची प्रत्यक्ष सुरुवात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करण्यात आली. या मोहिमेसाठी २४ जानेवारी २०२६ रोजी बेळगावमधून सुमारे २५० कार्यकर्त्यांचा ताफा रायगडकडे रवाना झाला होता.
या यात्रेला निघण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच असलेल्या दळवी यांनी युवकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले. रायगडावर जाण्यापूर्वी २५ जानेवारी रोजी कार्यकर्त्यांनी महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी समतेच्या या भूमीला अभिवादन केले.
२६ जानेवारी रोजी सकाळी सर्व कार्यकर्ते रायगडावरील होळीच्या माळावर एकत्र आले. शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर तिथेच एक छोटी सभा पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ आणि ‘बेळगाव आमच्या हक्काचे’ अशा घोषणा दिल्या. सुट्ट्यांमुळे गडावर आलेल्या हजारो पर्यटकांचे लक्ष या घोषणांनी वेधून घेतले.
सभेत बोलताना कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत ४० लाख मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. महाराष्ट्र सरकारने आपली उदासीनता झटकून केंद्र सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन त्यांनी केले. खानापूर समितीचे आबासाहेब दळवी आणि बिदरचे दिनेश मुधाळे यांनीही सीमाप्रश्नी युवकांच्या या उठावाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. बेळगाव युवा सेनेचे विनायक हुलजी यांनीही गडावर उपस्थित राहून सीमावासीयांच्या पाठीशी ठाम राहण्याची ग्वाही दिली.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी कर्नाटक सरकारच्या भाषिक अत्याचारावर कडक प्रहार केला. “आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नसून आमची भाषा आणि संस्कृती मागत आहोत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘लढा… नाहीतर गुलामीची सवय होईल’ ही घोषणा देऊन त्यांनी युवकांना जागृत राहण्याचे आवाहन केले. यानंतर येळ्ळूर भजनी मंडळाच्या गजरात शिवकालीन बाजारपेठेतून मोठी मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत सीमालढ्यातील पहिल्या पिढीपासून ते चौथ्या पिढीतील बालकेही सहभागी झाली होती. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन तिथल्या पवित्र मातीचे संकलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यावेळी सीमाप्रश्नी एकजुटीची शपथ घेतली. गडावर आलेल्या नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा विविध भागातील पर्यटकांना कार्यकर्त्यांनी वैयक्तिक रित्या भेटून सीमाप्रश्नाची माहिती दिली, ज्याला पर्यटकांनीही मनापासून पाठिंबा दिला.
या मोहिमेत खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, सरचिटणीस मनोहर हुंदरे, अशोक घगवे, श्रीकांत नांदुरकर, शिवाजी हावळाणाचे, सुरज जाधव, सचिन दळवी, ऍड. वैभव कुट्रे, भूपाल पाटील, मोतेश बारदेशकर, राजू पाटील, रमेश माळवी, प्रकाश हेब्बाजी, अनिल वाडेकर, महेंद्र जाधव, किरण धामणेकर, दीपक कोले, स्वप्निल पाटील, पत्रकार नरेश पाटील, जोतिबा यळूरकर, अरुंधती दळवी, तेजस्विनी दळवी, गंधार उमेश पाटील, यथार्थ, विनायक मजुकर, अमोल चौगुले, ओमकार बैलूरकर, उमेश पाटील, सुशांत देसाई, शिवराज यलजी तसेच चौथ्या पिढीतील आदेश हुंदरे, प्रणव घगवे, श्रीशंभु मंडोळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले तर आभार मनोहर हुंदरे यांनी मानले.





