belgaum

महाडमध्ये चवदार तळ्याला अभिवादन करून मराठी सन्मान यात्रेची सुरुवात;

0
505
 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथून सुरू होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २५ जानेवारी) सुमारे २०० ते २२५ कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे व क्रांतीभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

महाड शहराच्या मध्यभागी असलेले चवदार तळे सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. अस्पृश्यांना पाण्याचा वापर करण्यास मनाई असलेल्या या तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला आणि २० मार्च १९२७ रोजी हे पाणी समाजातील सर्व घटकांसाठी खुले झाले. याच ऐतिहासिक स्मृतीला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याला भेट देत बाबासाहेबांना मानवंदना दिली.

या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र साळवे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आणि सीमाप्रश्नी सीमावासीयांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. यावेळी स्मारक समितीचे प्रशांत जाधव, दीपक घाडगे आणि प्रदीप सकपाळ हे पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

याप्रसंगी बोलताना अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानावरच भारताची लोकशाही चालते. त्याच संविधानावर विश्वास ठेवून सीमावासी गेली सत्तर वर्षे लोकशाही मार्गाने आपला लढा लढत आहेत. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सीमाप्रश्नी आम्हाला नक्कीच न्याय मिळेल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांनी “डॉ. बाबासाहेबांचा विजय असो” आणि “बेळगाव, कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या कार्यक्रमास नगरसेवक शिवाजी मंडोळकर, महादेव पाटील, शिवाजी हवळाणाचे, मोतेश बारदेशकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, श्रीकांत नांदूरकर, सुरज जाधव, सचिन दळवी, ॲड. वैभव कुट्रे, माणगावचे रायगड जिल्हा प्रतिनिधी तसेच पत्रकार नरेश पाटील, रमेश माळवी, भूपाल पाटील, महेंद्र जाधव, सुशांत देसाई, निखिल देसाई, प्रकाश हेब्बाजी आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मिता जागृती व सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मराठी सन्मान यात्रेची औपचारिक सुरुवात करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.