बेळगाव लाईव्ह : मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर संधी मिळू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे भारत नगर, शहापूर येथील कु. प्रतीक्षा पांडुरंग भादवणकर. एम एस इन सी बिजनेस अनॅलेटिक्स या कोर्सच्या
उच्च शिक्षणासाठी ती इंग्लंडमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे रवाना होत असून, तिचा भारत नगर वडगाव येथील खन्नूकर कुटुंबीयांच्या वतीने गौरव करण्यात आला.
प्रतीक्षाने आपले शालेय प्राथमिक माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून गोमटेश शाळेतुन पूर्ण केले. पुढे गोगटे कॉलेज मधूनपीयूसी आणि बीबीएगोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी घेत तिने शैक्षणिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. आता थेट आंतरराष्ट्रीय विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी तिची निवड होणे ही केवळ वैयक्तिक यशाची नव्हे, तर मराठी माध्यमाच्या ताकदीची पावती मानली जात आहे.
या गौरव समारंभात एस. एम. खन्नूकर व खन्नूकर कुटुंबीयांनी प्रतीक्षेला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, “मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कधीही न्यूनगंड बाळगू नये. जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर जगातील सर्वोत्तम विद्यापीठांचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतात,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

प्रतीक्षाची ही झेप सीमाभागातील आणि मराठी माध्यमातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारी आहे.
आज शहापूरच्या एका मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी थेट लंडनच्या नामांकित विद्यापीठात पोहोचत आहे — ही केवळ एका विद्यार्थिनीची कहाणी नाही, तर स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची मराठी तरुणाईला मिळालेली नवी उमेद आहे.





