बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील खादरवाडी गावाजवळील मोकळ्या माळरानावर मच्छे पट्टणपंचायतीने नियोजित केलेल्या कचरा डेपोला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.
खादरवाडी गावाजवळील खुल्या जमिनीवर कचरा डेपो सुरू करण्यासाठी मच्छे पट्टणपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच जागेची पाहणी केली. मात्र, हा प्रकल्प झाल्यास गावातील वातावरण दूषित होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल, असा दावा करत गावकऱ्यांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने आता कचऱ्याची समस्या आमच्या उंबरठ्यावर आणू नये, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या नियोजित जागेबाबत माहिती देताना गावकऱ्यांनी सांगितले की, सदर जमिनीलगत दोन तलाव, गावची स्मशानभूमी आणि मराठा मंडळाची शाळा आहे. तसेच खादरवाडी गाव या ठिकाणाहून अवघ्या २०० मीटर अंतरावर आहे. कचरा डेपोमुळे या परिसरातील जलस्त्रोत प्रदूषित होतील आणि दुर्गंधीमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. सध्या ही जागा जनावरांच्या चराईसाठी वापरली जाते, तो प्रश्नही या प्रकल्पामुळे गंभीर होणार आहे.

गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि रस्त्यांची दुरवस्था आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ कचरा डेपोसाठी गावाची निवड करत असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. “आम्हाला आमचे प्राण गमवावे लागले तरी हरकत नाही, परंतु या ठिकाणी कचरा डेपो होऊ देणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
जर प्रशासनाने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला, तर आमरण उपोषण करण्यासोबतच राष्ट्रीय महामार्ग अडवून तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया खादरवाडी गावकऱ्यांनी दिली.





