बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मच्छे गावातील भारत नगर परिसरात सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गटारांचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मिसळत असून, यामुळे लहान मुलांसह नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून भारत नगर, दुसरी क्रॉस येथील रहिवासी या समस्येचा सामना करत आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारे नसल्याने हे दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये पाझरत आहे. यामुळे परिसरात पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले वारंवार बाधित होत आहेत.
या संदर्भात रहिवाशांनी ११ जून २०२५ रोजी स्थानिक ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन ही परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. परिसरात कोणतीही मोठी साथ पसरण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
कोणताही मोठा अनर्थ घडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने या समस्येची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारत नगरमधील संतप्त नागरिकांनी केली आहे.





