बेळगाव लाईव्ह :उद्यमबाग, खानापूर रोड जवळील बालाजी वे ब्रिज शेजारील रस्त्यावर कारगाडीमध्ये बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारूची विक्री करणाऱ्या दोघा जणांना बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी आज अटक करून त्यांच्या जवळील विविध कंपन्यांच्या 77.760 लिटर दारूसह एकूण 5 लाख 12 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे हणमंत तमन्ना नायकर (वय 42) आणि रमेश अर्जुनप्पा मुलीमनी (वय 39, दोघेही रा. शारदाळ ता. जि. बागलकोट) अशी आहेत.
हे दोघे आज शुक्रवारी उद्यमबाग, खानापूर रोड जवळील बालाजी वे ब्रिज शेजारील रस्त्यावर सुझुकी सेलेरिओ कारगाडीमध्ये (क्र. केए 29 पी 5010) कोणताही अधिकृत परवाना नसताना गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत होते.
त्यावेळी बेळगाव शहर सीसीबी पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील रियल सेवेन ट्रिपल एक्स रमच्या प्रत्येकी 180 लिटरच्या 288 प्लास्टिक बाटल्या भरलेले 7,776 रुपये किमतीचे 6 दारूचे बॉक्स,
रियल चॉईस ऑरेंज होडका कंपनीचे 180 लिटरच्या 96 प्लास्टिक बाटल्या भरलेले 3,456 रुपये किमतीचे दोन दारूचे बॉक्स आणि गोल्ड अँड ब्लॅक ट्रिपल एक्स रमचे 180 लिटरच्या 48 प्लास्टिक बाटल्या भरलेला 1,584 रुपये किमतीचा एक दारूचा बॉक्स
त्याचप्रमाणे 5 लाख रुपये किमतीची सुझुकी सेलेरिओ कार गाडी असा एकूण 5,12,816 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.घरामध्ये बेकायदा गांजा ओढणाऱ्या एका इसमाला माळमारुती पोलिसांनी आज शुक्रवारी शिवबसवनगर बेळगाव येथे अटक केली.
राहुल विठ्ठल बंती (वय 32, रा. मूळचा बसवकॉलनी हुक्केरी, सध्या शिवबसवनगर बेळगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव आहे. राहुल हा आपल्या घरामध्ये दररोज कायद्याने बंदी असलेला अंमली पदार्थ गांजाचे सेवन करत होता. याबाबतची माहिती मिळताच माळमारुती पोलीस पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून राहुल याला पकडले आणि त्याच्याकडे 6,700 रुपये किमतीचा 134 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




